| शिवाजी माध्यमिक विद्यालयाची सुवर्णमहोत्सवी वाटचाल |
दिगंबर नांद्रे
मुख्याध्यापक, शिवाजी विद्यालय, शेवाळी, ता. साक्री
धुळे जिल्ह्य़ाच्या
साक्री तालुक्यातील शेवाळी (दा.) येथील साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित
शिवाजी माध्यमिक विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांस नुकतीच सुरुवात झाली आहे.
त्यानिमित्त..
पुरोगामी
महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या सत्यशोधक चळवळीने जेव्हा समाजपरिवर्तनासाठी
शैक्षणिक विकासाला महत्त्व दिले, तेव्हा
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख, भाऊसाहेब शिंदे, काकासाहेब वाघ, वि. द. घाटे, गुरुवर्य बा. ग. जगताप, बापूजी साळुंके, पा. रा. घोगरे, कर्मवीर व्यंकटराव रणधीर, असे शिक्षणमहर्षी उदयास आले. या मालिकेतील खान्देशचे शिक्षणमहर्षी
म्हणजे कर्मवीर अप्पासाहेब शंकरराव चिंधुजी बेडसे होय. महात्मा जोतिबा फुले
यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत तसेच राजर्षी शाहू व सयाजीराव गायकवाड यांच्या
कार्यापासून स्फूर्ती घेऊन कर्मवीर अप्पासाहेबांनी साक्री तालुका एज्युकेशन
सोसायटीच्या माधवराव गोपाळराव भोसले यांनी लावलेल्या रोपटय़ाचे वटवृक्षात रूपांतर
केले.
शेवाळी हे पुरोगामी
विचारांचे गाव. येथे स्वतंत्र असहकार, सत्यशोधक, शेतकरी कामगार, कम्युनिस्ट, संयुक्त महाराष्ट्र, गोवामुक्ती आंदोलन, अशा अनेक
परिवर्तनवादी चळवळी रुजल्या, फोफावल्या. कर्मवीर अप्पासाहेब बेडसे
शेतकरी कामगार पक्षातर्फे व संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे असे दोन वेळा आमदार
म्हणून निवडून गेले. शेवाळी गाव म्हणजे अप्पासाहेबांचा बालेकिल्ला. भद्रावती
नदीजवळ लाल बावटय़ाचा २५ फुटी ध्वज नेहमी फडकत राही. आ. म. पाटील, भिवसन मास्तर, कासमदादा, महंमददादा, विक्रम भिका, निंबा भिका, शिवराम चिंधू, एलजी हिराजी, सुपडूतात्या, दातर्तीचे मल्हारी मोठाभाऊ, फुला यादव, भाईकाका, दगा राजाराम, कॉ. वेडू शंकर नांद्रे, उखाजी रामचंद्र नांद्रे, श्रावण वेडू सोनवणे, देवराव सुकलाल
नांद्रे, अर्जुन पाटील, दगाजीअण्णा साळुंके यांसह परिसरातील अप्पासाहेबांवर जिवापाड प्रेम
करणारे चळवळीतले अनेक कार्यकर्ते होते.
तेव्हा शेवाळी
गावात सातवीपर्यंत प्राथमिक शाळा होती. राष्ट्रपती पुरस्कार मिळविणारे नामवंत
शिक्षक शाळेत होते. ही शाळा धुळे जिल्'ाातील विद्या संस्कृतीचे केंद्र होती. गावात लळीत, नाटके होत. बाहेरगावचेही अनेक विद्यार्थी शाळेत शिकत, नातेवाईकांकडे राहात. सातवीनंतर मात्र बहुतेक मुला-मुलींचे शिक्षण
थांबायचे, कारण पायी साक्रीला जावे लागे.
त्याकाळी वाहनांची फारशी व्यवस्था नव्हती. मित्रांनी शेवाळी गावात माध्यमिक
विद्यालय सुरू करण्याची विनंती अप्पासाहेबांना केली. अप्पासाहेब त्या वेळी आमदार
होते. ११ जून १९६२ रोजी शंकर श्रीपत साळुंके यांच्या घरात ८ वी आणि ९ वीचे वर्ग
सुरू केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शाळेला दिले. शाळेला ताबडतोब शासनाची
मंजुरी मिळाली. आर.पी. शेटे पहिले मुख्याध्यापक होते. वाय.जी. पाटील त्यांच्या
जोडीला होते. पुढे लक्ष्मण दिगंबर साळुंके यांच्या घरात व गोदामात इ. १० वी आणि ११
वीचे वर्ग भरू लागले. गावाच्या उत्तरेला भद्रावती नदीकाठी खळवाडी होती. शाळेसाठी
स्वतंत्र इमारत असावी, अशी कल्पना अप्पासाहेबांनी
ग्रामस्थांसमोर मांडली. लोकांनी खळवाडीची जागा शाळेला दिली. जमिनीचे सपाटीकरण
केले. चुन्याचे घाणे सुरू केले.
अप्पासाहेब राहुटी
करून राहत. गावकऱ्यांचे सहकार्य होतेच. विनामोबदला श्रमदानाने काम सुरू झाले. दगड
आणले. प्रथम चार खोल्या बांधण्यात आल्या. नवीन झाडे लावली. निसर्गरम्य परिसरात
ज्ञानदानाचे कार्य सुरू झाले. कौलारू इमारत होती. ८ वी, ९ वी, १० वी व ११ वी अशी चार वर्गाची इमारत
बांधली, नंतर तीन खोल्यांचे बांधकाम केले.
शासकीय धोरणानुसार पुढे ५ वी ते १० वी असे सहा वर्ग झाले. १९७९ मध्ये जादा तीन
खोल्या व कौले काढून सीमेंट पत्रा टाकला. १९९५ मध्ये स्लॅब इमारतीच्या खोल्यांचे
बांधकाम करण्यात आले. व्यायामशाळा, कंपाऊंड भिंत
बांधली. जिन्याचे बांधकाम झाले. सुवर्णमहोत्सवी वर्षांत विज्ञान दालन व संगणक दालन
अशा दोन खोल्यांच्या बांधकामाचा प्रस्ताव आहे.
जून २००८ पासून
कार्यानुभव या विषयांतर्गत मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा पूर्व व्यावसायिक
अभ्यासक्रम सुरू झाला. त्याचे अभियांत्रिकी, ऊर्जा व पर्यावरण, कृषी व पशुपालन, गृह व आरोग्यशास्त्र असे चार विभाग आहेत. महात्मा गांधीजींच्या
मूलोद्योग शिक्षण तत्वावर हा अभ्यासक्रम आहे. बाबा आमटेंच्या उक्तीला कृतीची जोड
दिली आहे. ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने बाबा आमटे, यदुनाथ थत्ते असे परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते तेथे आले होते.
त्यांनी लावलेल्या रोपटय़ांचे संगोपन विद्यार्थी व शिक्षकांनी केले. बांबू वन, चिंचबन, निंब, फुलकेसर, गुलमोहर अशा विविध प्रकारच्या
वृक्षांनी परिसर बहरला आहे.
आदर्श अभियंता
म्हणून नावारूपास आलेले सतीश साळुंके, उद्योजक शीतल साळुंके, सिंगापूर येथे स्थायिक झालेला संशोधक डॉ. प्रशांत सोनार, बजाज ऑटोमधील पंकज मराठे, नाशिक शहरात विद्यादानाचे कार्य करणारा सुरेश साळुंके, कऱ्हाड फार्मसी कॉलेजमध्ये विशेष गुणवत्ता मिळविणारा केतन मराठे, फार्मसीमध्ये यशस्वी झालेला हेमकांत जाधव, विज्ञान विषयात पारंगत जयेश साळुंके, वैद्यकीय व्यवसायात मुंबईत नाव कमावणारा अमृत साळुंके, आयआयटीमध्ये गोल्ड मेडल मिळविणारा इंजिनीअर हर्षल कुवर, उपक्रमशील प्रतिभा साळुंके, उत्कृष्ट ग्रामसेवक विजय काकुळते, एमपीएससी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून अधिकारी असलेला सुनील जाधव, लेखणीचे कौशल्य दाखविणारा उखाजी साळुंके, राजकारणात व समाजकारणात स्थान मिळविणारे प्रकाश सोनवणे, सिमेन्समधील कामगार ते यशस्वी उद्योजकांपर्यंत मजल मारणारे साहेबराव
साळुंके, वैद्यकीय क्षेत्रातील यशस्वी झालेले
डॉ. अनिल नांद्रे, मराठी विषयात डॉक्टरेट मिळवलेले डॉ.
प्रकाश साळुंके, इतिहासाचे डॉ. रवींद्र साळुंके, समाजशास्त्राचे डॉ. सुधाकर जाधव, प्रशासकीय कामात स्वत:चा ठसा उमटविणारे भालेराव भिवसन साळुंके, आर. डी. वाघ, संजय साळुंके, अशोक साळुंके, किरण साळुंके, युवा उद्योजक राजेंद्र साळुंके, यशस्वीपणे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले सुभाष नागो, जयवंत साळुंके, निंबाजी साळुंके, नोकरी सांभाळून नेतृत्व करणारे बाबुराव दादा, वसंत नांद्रे, अशोक जाधव, प्रकाश साळुंके, किरण नांद्रे, अरुणदादा साळुंके, कृषी तंत्रज्ञानाचा
वापर करून आधुनिक शेती करणारा अशोक भदाणे, व्यापारी क्षेत्रात प्रामाणिकपणा जोपासणारा साहेबराव जैन, शिल्पकार साहेबराव सोनवणे, राजकारण व समाजकारण यांचा समन्वय साधणारा नितीन साळुंके असे समाजात
कर्तृत्व गाजविणारे मान्यवर आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत याचा आम्हाला सार्थ
अभिमान आहे.
शाळेचे नाव
नावारूपाला आणणारे, परंतु आपली यात्रा अध्र्यावरच सोडून
गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये लोककलावंत शाहीर विश्वास साळुंके, पंडितराव साळुंके, साहेबराव साळुंके, जगदीश भदाणे, जगदीश साळुंके, जगदीश सोनार, विलास साळुंके, किशोर नांद्रे, त्र्यंबक साळुंके, टी. आर. सोनार, राजेंद्र साळुंके, अमृत साळुंके, शरद साळुंके, शिवाजी साळुंके, युनिसदादा शहा, नागो साळुंके, जयवंत साळुंके, प्रतिभा जाधव, माया साळुंके यांचा समावेश आहे.
शाळेत पाचवी ते १०
वीचे सहा वर्ग असून २९४ विद्यार्थी, १० शिक्षक व पाच शिक्षकेतर कर्मचारी आहेत. चित्रकला व शारीरिक शिक्षण
या विषयांना विशेष महत्त्व द्यावे, असे संस्थेच्या
घटनेत नमूद केले आहे. त्यानुसार शालेय शिक्षणाबरोबर सहशालेय उपक्रमांना विशेष
महत्त्व देण्यात येते. शाळेतील मुलींचा कबड्डीचा संघ राज्यपातळीपर्यंत खेळायला
जातो. गांधी विचार परीक्षेत सुवर्णपदक मिळविणारा विद्यार्थी याच शाळेचा.
विद्यालयात गरीब विद्यार्थी साहाय्य निधी, कायम ठेव बक्षीस योजना अशा विद्यार्थी कल्याणकारी योजना राबविल्या
जातात. काळाची पावले ओळखून जून २००९ पासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले आहेत.
विद्यालयाला जोडून शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केले आहे. या सर्व प्रगतीत
परिसरातील दातर्ती, महिर, कळंभीर, इच्छापूर, गंगापूर, अक्कलपाडा येथील पालकांचा सहभाग व
प्रेमही लाभत आहे.
संस्थेचे अध्यक्ष
अण्णासाहेब जयसिंगराव अहिरराव, महाराष्ट्रातील
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत कार्यकर्तृत्वाचा वैशिष्टय़पूर्ण ठसा
उमटविणारे सृजनशील व्यक्तीमत्त्व संस्थेचे सचिव माजी आमदार नानासाहेब जयतंराव ठाकरे, संस्थेचे विश्वस्त, व्यवस्थापन समितीचे
सदस्य या सर्वाचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. त्यामुळे विद्यालयाची प्रगतीच्या
दिशेने वाटचाल सुरू आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षांत माजी विद्यार्थी मेळावा, सेवानिवृत्त कर्मचारी मेळावा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. ५० वर्षांच्या
वाटचालीची स्मृतिचित्रे रेखाटणारी स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे
No comments:
Post a Comment